Tuesday, August 18, 2026
spot_img
Home रत्नागिरी खेडशी येथे रेल्वेच्या धडकेत मिरजोळेतील वृद्धाचा मृत्यू

खेडशी येथे रेल्वेच्या धडकेत मिरजोळेतील वृद्धाचा मृत्यू

कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

रत्नागिरी:- तालुक्यातील मिरजोळे, पाडावेवाडी येथील रहिवासी असलेल्या ५१ वर्षीय इसमाचा कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दशरथ शांताराम बेंडल (वय ५१ वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दशरथ बेंडल हे ६ ऑगस्ट २०२६ रोजी खेडशी बोगदा परिसरात काम करत होते. यादरम्यान त्यांना रेल्वेची धडक बसल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या अपघातात त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव होऊन कवटीला फ्रॅक्चर झाले होते.

त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील विन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असताना, १० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९:३५ वाजता प्रकृती अत्यंत खालावल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी १७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १० वाजता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.