खेडशी येथील वेश्या व्यवसाय प्रकरण; आरोपीच्या अडचणी वाढणार

रत्नागिरी:- खेडशी येथील लॉजवर वेश्या व्यवसाय चालत असल्याच्या प्रकाराबाबत पोलिसांकडून कठोर कायदेशीर पावले उचलली जात आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या ४ पीडित महिलांना पोलिसांनी न्यायालयापुढे हजर केले असून त्यांचा भारतीय न्याय सुरक्षा संहिता कायदा कलम १८३ नुसार जबाब नोंदवण्यात येत आहेत. पीडितांच्या जबाबामुळे आरोपींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

खेडशी येथे रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईने देहव्यापाराचा प्रकार उघड झाला होता. पोलिसांनी देहव्यापार करणाऱ्या चार महिलांना ताब्यात घेतले होते. तसेच हा अनैतिक व्यापार करणाऱ्या अरमान करीम खान (रा. कोकणनगर रत्नागिरी) या संशयिताला ताब्यात घेण्यात आले हाते. १३ मे रोजी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली होती. पीडित महिला या देहव्यापाराशी संबंधित असल्याने त्यांचे एका ठिकाणी वास्तव्य राहत नाही. त्यामुळे त्यांचा शोध घेणे पोलिसांसाठी जिकरीचे ठरते. अशावेळी भविष्यात या महिला न्यायालयापुढे साक्षीसाठी उपलब्ध न झाल्यास त्यांनी न्यायालयापुढे दिलेला जबाब महत्वाचा ठरतो. पीडित महिला या रत्नागिरीत कशाप्रकारे आल्या, त्यांना येथे कोणी आणले, किती दिवसापासून त्यांचे रत्नागिरीत वास्तव्य होतें, आदी माहिती न्यायालयापुढे येण्याची शक्यता आहे.