पोलिसात तक्रार केल्यास बदला घेण्याची धमकी
खेड:- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तळ कासारवाडी येथे एका मद्यधुंद मुलाने आपल्या वृद्ध वडिलांना बेदम मारहाण केली. या हाणामारीत वडिलांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपीने सोडवण्यासाठी गेलेल्या मुलीलाही त्याने धक्काबुक्की केली, अशी माहिती खेड पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा आत्माराम ताम्हणकर ( ७५, व्यवसाय सुतारकाम, रा. तळ कासारवाडी) हे आपल्या घरी असताना त्यांचा मुलगा सुभाष कृष्णा ताम्हणकर (४५) हा दारू पिऊन आला. त्याने घरात येताच मेन स्वीच बंद करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादी कृष्णा ताम्हणकर यांच्या पत्नीने स्वीच पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न केला असता, सुभाषने त्यांना हाताच्या थापटाने मारले. यामुळे संतप्त झालेल्या कृष्णा ताम्हणकर यांनी आपल्या हातातील बांबूच्या काठीने सुभाषला मारले. यानंतर सुभाषने त्यांच्या हातातून काठी हिसकावून घेत कृष्णा ताम्हणकर यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूला मारले. तसेच, त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटावरही दोन-तीन वेळा काठीने मारहाण केली.
या भांडणाचा आवाज ऐकून कृष्णा ताम्हणकर यांची नात व सुभाष याची मुलगी सोडवण्यासाठी आली असता, सुभाषने तिलाही शिवीगाळ करून ढकलून दिले. दरम्यान, आजूबाजूच्या लोकांनी मध्यस्थी करत दोघांनाही सोडवले. मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने कृष्णा ताम्हणकर यांना तातडीने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
फिर्यादी कृष्णा ताम्हणकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सुभाषने त्यांना पोलिसात तक्रार केल्यास बदला घेण्याची धमकी दिली व शिवीगाळ केली. याप्रकरणी खेड पोलिसांनी सुभाषवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.