खेडमध्ये महिलेला बांबूने मारहाण; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

खेड:- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सुखदर दयाळकरवाडी येथे आपली बदनामी का करता, अशी विचारणा करण्यास गेलेल्या एका ४५ वर्षीय महिलेला दोघांनी मिळून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती बाळाराम दयाळकर (वय ४५, सध्या रा. दिवा पूर्व, मूळ रा. दयाळकरवाडी) या रविवारी, ५ जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास सुखदर दयाळकरवाडी येथील आपल्या घरी होत्या. यावेळी संशयित आरोपी दशरथ महादेव सावदेकर हा आपली बदनामी करत असल्याचे समजल्याने ज्योती दयाळकर या त्याला जाब विचारण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी संशयित दशरथ सावदेकर आणि सतीश शांताराम सावदेकर या दोघांनी फिर्यादी महिलेला हाताच्या थापटाने मारहाण करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने संशयित दशरथ सावदेकर याने लहान आणि मोठ्या बांबूने फिर्यादीच्या पाठीत जोराने मारून त्यांना दुखापत केली.

या घटनेदरम्यान दोन्ही संशयितांनी फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी जखमी ज्योती दयाळकर यांनी खेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीवरून दशरथ सावदेकर आणि सतीश सावदेकर यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३) आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदवला आहे. ५ जानेवारी रोजी रात्री ८ वाजून २७ मिनिटांनी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.