Sunday, May 10, 2026
spot_img
Home राजकीय खासदार राणेंप्रमाणे मी देखील महायुतीसाठी आग्रही: ना. सामंत

खासदार राणेंप्रमाणे मी देखील महायुतीसाठी आग्रही: ना. सामंत

रत्नागिरी:- खा. नारायण राणे व मी महायुतीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये आग्रही आहे. याबाबत आमची चर्चा ही झाली असून याबाबत पक्षाच्या वरिष्ठांकडून लवकरच घोषणा होईल असे स्पष्ट मत राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. राज्यात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम महायुती सरकारने कर्जमाफी देऊन केली असल्याचे सांगतानाच, रत्नागिरीसह कोकणातही या पावसाचा मोठा फटका बसला असून शेतातील भाताबरोबरच कापलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले असून त्याचा पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरी येथे शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, पाऊस लांबल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. रत्नागिरीबरोबरच सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे आदी भागामध्ये भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभ्या पिकाबरोबरच कापलेल्या भातालाही पावसाचा फटका बसला आहे. याबाबत सर्वे करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लोकसभेनंतर आम्ही विधानसभेला सामोरे गेलो त्यावेळी आम्ही सगळ्यांनी एक वचननामा तयार केलेला होता. शेतकऱ्यांना संकटाच्या काळात कर्जमाफी देऊन त्यांच्यावरील संकट दूर करण्याचे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी आम्ही कर्जमाफी करून ही भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली होती आणि आज मला सांगताना समाधान आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून, त्यांनी व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी बळीराजासाठी दिलेला शब्द पूर्ण केला आहे हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. जी कर्जमाफीची तारीख दिलेली आहे त्या तारखेपर्यंत कर्जमाफी नक्की होईल आणि याचे परिणाम काय होतील तर ज्या पद्धतीने दुष्काळ झाला. त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याची ताकद ही महाराष्ट्रातल्या बळीराजाला मिळणार आहे. कोकणामध्ये पाऊस सुरू आहे त्या पावसाच्या संदर्भामध्ये देखील सकाळी माझे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं झालं त्याचा देखील नुकसानीचा सर्वे करण्याचे आदेश हे एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या बळीराजाला हेच सांगायचं की ना. शिंदे असतील देवेंद्रजी असतील अजित दादा असतील हे सरकार चालवत असताना बळीराजाचं हित कशामध्ये आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा दिलासा मिळाला पाहिजे यासाठीच आम्ही सरकार चालवतोय आणि त्याची प्रचिती अख्ख्या महाराष्ट्रातल्या बळीराजांना आलेली आहे.
विरोधक ज्या ज्या पद्धतीचं भांडवल करतात त्याला उत्तर महायुतीचं सरकार हे काम करून देत आहे, ते पुन्हा एकदा सिद्ध झालंय आणि बळीराजांच्या मागं महायुतीच सरकार आहेच, परंतु शिवसेना पक्ष म्हणून आम्ही देखील परवाच्या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये स्वतः एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन लाखो शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. शिवसेना पक्ष म्हणून तर मदत करते आहेच, परंतु सरकारच्या माध्यमातून देखील मदत मिळावी यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आम्हाला यश आलंय हे देखील आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे ना. सामंत यांनी स्पष्ट केले. बच्चू कडू यांनी आंदोलन करायच्या अगोदरच कर्जमाफीसाठी समितीची स्थापना केलेली होती समितीचे गठन केलेलं होतं पूर परिस्थितीची निर्माण झाली त्याला देखील 32,008 कोटीचा पॅकेज ते मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं त्याच्यामुळे शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू आहे हे देखील सरकारने दाखवून दिले आहे.

जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना ना. सामंत म्हणाले की खा. नारायण राणे व आपण युती करुन निवडणूक लढण्यास इच्छूक आहोत. वरिष्ठ याबाबत योग्य निर्णय घेतील असेही स्पष्ट केले.