एकच छताखाली घरांचे असंख्य पर्याय, बँकाही देणार कर्जाची माहिती
रत्नागिरी:- कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी क्रेडाई रत्नागिरीने ‘वास्तुरंग कोकण प्रॉपर्टी प्रदर्शन २०२६’ चे शुक्रवार 23 जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे. पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार असून आमदार किरण उर्फ भय्या सामंत यांची देखील यावेळी उपस्थिती असणार आहे.
साळवी स्टॉप येथील शासकीय जलतरण तलावा जवळील मैदानात क्रेडाई रत्नागिरी यांच्याकडून कोकणातील सर्वात विशाल वास्तू प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 23 ते 26 जानेवारी दरम्यान हा सातवा कोकण प्रॉपर्टी एक्स्पो भरवण्यात येणार असल्याची माहिती क्रेडाई अध्यक्ष महेश गुंदेचा यांनी दिली. या प्रदर्शनातून गृहस्वप्न पूर्तीची मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
शुक्रवारी सायंकाळी 4.30 वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी त्यांच्या सोबत आमदार किरण सामंत, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, कोस्टगार्डचे टी. एन. उपाध्ये, मुख्याधिकारी वैभव गारवे, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, नगर विकास विभागाचे विराज बोडस आदी उपस्थित राहणार आहेत.
क्रेडाई मार्फत आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे एकाच छताखाली ग्राहकांना असंख्य पर्याय पाहायला मिळणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील नामांकित बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचे १-२ बीएचके फ्लॅट्स, आलिशान बंगले, रो-हाउसेस आणि गुंतवणुकीसाठी एन.ए. प्लॉट्सचे विविध प्रकल्प येथे सादर केले जातील. विशेष म्हणजे, प्रदर्शनातील सर्व प्रकल्प ‘महारेरा’ नोंदणीकृत असल्याने ग्राहकांना व्यवहारात पूर्ण पारदर्शकता आणि विश्वासार्हता मिळणार आहे.
केवळ घरांचे पर्यायच नव्हे, तर घर खरेदीसाठी लागणाऱ्या अर्थसाह्यासाठीही येथे सोय करण्यात आली आहे. विविध नामांकित बँकांचे स्टॉल्स प्रदर्शनात उपस्थित राहणार असून, ग्राहकांना तिथेच आपल्या कर्जाची पात्रता तपासून गृहकर्जाच्या प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती घेता येणं शक्य आहे.









