क्रांतीनगर येथे मटका जुगारावर पोलिसांचा छापा

रत्नागिरी:- शहरातील चर्मालय ते कोकणनगर जाणाऱ्या रस्त्यावर क्रांतीनगर कमानीच्या एका टी-स्टॉलच्या बोळात मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निहाल करिम होडेकर (वय २४, रा. मिरकरवाडा, वरचा मोहल्ला-रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १७) दुपारी सव्वाच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित हा विनापरवाना मटका-जुगार चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी कारवाई करुन त्यांच्याकडील साहित्यासह ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल उमेश पवार यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.