कोतवडे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे बौद्धवाडी येथे सार्वजनिक विहिरीत पडलेल्या एका बिबट्याची आज वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी सुटका करण्यात आली. सकाळी साडेसात वाजता ही घटना उघडकीस आली, त्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत बिबट्याला पिंजऱ्यात सुरक्षित पकडण्यात आले.

आज, दिनांक २३ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास कोटवडे गावचे सरपंच संतोष बारगोडे यांनी पाली येथील वनपाल यांना एका बिबट्याच्या विहिरीत पडल्याची माहिती दिली. माहिती मिळताच तात्काळ वन परिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी यांना कळवण्यात आले. त्यानंतर बचाव पथक, पिंजरा आणि इतर आवश्यक साहित्यासह घटनास्थळी दाखल झाले.

ही विहीर ग्रामपंचायतीच्या घर क्रमांक ४२२ च्या मागील बाजूस भर वस्तीमध्ये आहे. ४० फूट खोल असलेल्या या विहिरीला तीन फूट उंचीचा चिरेबंदी कठडा आहे. विहिरीतील पाण्याची पातळी १० ते १२ फूट असून, बिबट्या विहिरीत उतरण्यासाठी असलेल्या पायरीवर पाण्यात बसलेला होता.

बिबट्याला पाहिल्यानंतर बचाव पथकाने तात्काळ नियोजन केले. पिंजऱ्याला दोऱ्या बांधून तो सुरक्षितपणे विहिरीत सोडण्यात आला. बिबट्याने अवघ्या १५ मिनिटांत पिंजऱ्यात प्रवेश केला आणि त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पशुधन विकास अधिकारी डॉ. अभिजीत भगवान कसाळकर यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली. तपासणीत बिबट्या पूर्णपणे सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. हा नर बिबट्या असून, त्याचे वय अंदाजे ९ ते १० वर्षे आहे.
स्थानिक परिस्थिती पाहता, भक्ष्याचा पाठलाग करत असताना बिबट्या विहिरीत पडला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ही विहीर शेडनेटने झाकलेली असून, त्यामुळे त्याला बाहेर पडता आले नाही.

ही बचाव मोहीम विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कामगिरीसाठी परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, वनपाल न्हानू गावडे, वनरक्षक विराज संसारे, शर्वरी कदम, शाहीद तांबोळी, ऋषिकेश जोशी, महेश धोत्रे, तसेच पोलीस अधिकारी मनोज पावसकर, वाडकर, होमगार्ड मनोज मोहिते यांनी परिश्रम घेतले.
या बचाव कार्यात सरपंच संतोष बारगोडे, उपसरपंच स्वप्नील पड्याळ, पोलीस पाटील पूर्वा पवार, ग्रामपंचायत सदस्य वैष्णवी माने, दीया कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र कांबळे, तसेच अनंत फणसोपकर, मयुरेश कांबळे, सुनील कांबळे, सुहास मोहिते, साहिल कांबळे आणि इतर ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

वन अधिकाऱ्यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. सुखरूप असलेल्या या बिबट्याला नंतर त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्य प्राणी अडचणीत सापडल्यास तात्काळ वन विभागाच्या १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी रत्नागिरी यांनी केले आहे.