कोकण रेल्वेत प्रवाशांच्या मोबाईलसह दागिने लुटले

रत्नागिरी:- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे. ऑक्टोबर महिन्यापासून रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली असून गर्दीचा फायदा उठवण्यासाठी कोकण रेल्वेत चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात संपर्क क्रांती एक्सप्रेसमधून प्रवास करणार्‍या तीन प्रवाशांना लुटल्याची तक्रार दाखल झाली आहे. यामध्ये सुमारे दोन लाखाचा ऐवज लंपास झाला आहे.

कोकण रेल्वेतून प्रवास करणार्‍या तीन प्रवाशांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यात रत्नागिरी रेल्वे स्थानका दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ऐवज लंपास केल्याचे म्हटले आहे. विष्णू श्रीनिवास नंब्बला (रा. केरण) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 ऑक्टोबर रोजी संपर्कक्रांती एक्सप्रेसने प्रवास करत असताना त्यांचा एक लाख वीस हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबविला गेला आहे. याच गाडीतून प्रवास करणार्‍या रविनाथन  पि. टी. यांची हॅण्ड बॅग अज्ञात चोरटयाने लांबवली. त्यात पाच हजार रुपये रोख आणि आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि अन्य साहित्य होते. मनीष गडिया (रा. पालघर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ओखा एक्सप्रेसमधून प्रवास करताना सुमारे साठ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. त्यामध्ये नऊ ग्रम वजनाची सोन्याची चेन, दोन अंगठ्या असा ऐवज होता. तिन्ही तक्रारदाराची तक्रार शहर पोलिसांनी दाखल करून घेतली असून चोरट्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकात गाडी आल्यानंतर गाडी थांबते. यावेळी प्रवाशांना जाग येते; मात्र चोरी त्यापुर्वीच झालेली असल्यामुळे ही घटना नेमकी कोणत्या भागात झाली हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे रेल्वे पोलिसांपुढील आव्हान वाढले आहे.