चिपळूण:- कोकणात पनवेल ते सावंतवाडी दरम्यान राष्ट्रीय महामार्ग व सागरी महामार्ग असताना आणखी स्वतंत्र एक्स्प्रेस वे उभारला जाणार आहे. त्याला राज्य सरकारने तत्त्वत: मान्यता दिली असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
चिपळूण दौऱ्यावर आलेल्या तटकरे यांनी मंगळवारी येथील पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर ते बोलत होते. ते म्हणाले की, मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरण व सागरी महामार्गाचे काम पूर्ण केले जाणारच आहे. त्याव्यतिरिक्त स्वतंत्र एक्स्प्रेस वे चा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला असून, ही माहिती आपण जबाबदारीने देत आहे. कारण या प्रस्तावाला सरकारने तत्त्वत: मान्यता दिली असून, त्याचा पाठपुरावा मंत्रिमंडळाची पायाभूत समिती घेत आहे. या समितीत मुख्यमंत्री प्रमुख म्हणून काम करतात. शिवाय उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री यांचा समावेश आहे.
सुनील तटकरे यांनी कृषी विधेयक व कामगार विधेयकावर जोरदार ताशेरे ओढले. कृषी विधेयक पारित झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. एखाद्या वेळी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर न मिळाल्यास ते या नवीन विधेयकाअंतर्गत कोणाकडेही तक्रार करु शकत नाही. तसेच कामगार विधेयकही कामगारांना देशोधडीला लावणारे आहे. आता ३०० पर्यंत कामगार क्षमता असलेला कारखाना क्षणात बंद करण्याचा अधिकार दिला आहे. या विधेयकांच्या माध्यमातून भांडवलदारांनी भांडवलदारांची पाठराखण केली असल्याचा आरोप तटकरे यांनी केला.









