रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील कोंब्ये-आडीवरे येथील वृद्धाला साप चावला. उपचारासाठी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जयवंत विश्वनाथ नार्वेकर (वय ७०, रा. कोंब्ये-आडिवरे ता. राजापूर) असे साप चावलेल्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २४) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जयवंत नार्वेकर हे सकाळी घराच्या परिसरात साफ सफाई करत होते. अचानक त्यांना सापाने दंश केला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना सकाळी अकराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.









