Sunday, July 12, 2026
spot_img
Home राजापूर अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध

अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध

बारसू-सोलगाव अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात राजापूर पंचायत समितीचा एकमुखी ठराव

राजापूर:- तालुक्यातील बारसू-सोलगाव येथे प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असल्याचे नमूद करत राजापूर पंचायत समितीच्या मासिक सभेत या प्रकल्पाविरोधात एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला. जनभावनांचा आदर करून हा प्रकल्प पुढे नेऊ नये, अशी भूमिका सदस्यांनी स्पष्टपणे मांडली. याशिवाय रस्ते, वीज, कृषी आणि शिक्षण विभागाच्या कामकाजावरही सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

राजापूर पंचायत समितीच्या किसान भवन येथे सभापती नंदिनी कदम यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा पार पडली. बारसू-सोलगाव अनुऊर्जा प्रकल्पाच्या विषयावर झालेल्या चर्चेत सर्व सदस्यांनी एकमताने प्रकल्पाला विरोध दर्शवित ठराव मंजूर केला. स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन हा प्रकल्प मंजूर करू नये, अशी भूमिका सभेत नोंदविण्यात आली.

उपसभापती अभिजीत गुरव, गटविकास अधिकारी रोहित कुंभार, सहाय्यक गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, शिवसेनेचे गटनेते उमेश पराडकर, प्रतोद प्रसाद मोहरकर, पंचायत समिती सदस्य आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सभेत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेताना काही विभागांचे अधिकारी अथवा त्यांचे प्रतिनिधी अनुपस्थित राहिल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण आणि कृषी विभागाच्या कामकाजातील त्रुटींवर विशेष चर्चा झाली. विकासकामांमधील दिरंगाई, नागरिकांच्या तक्रारींकडे होणारे दुर्लक्ष आणि प्रशासकीय कार्यपद्धतीवर सदस्यांनी कठोर शब्दांत टीका केली.

तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दाही सभेत गाजला. ओणी-अणूस्कुरा मार्गावरील मोठमोठ्या खड्डयांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास होत असल्याचे सदस्य उमेश पराडकर आणि अपेक्षा मासये यांनी निदर्शनास आणून दिले. या मार्गाची तातडीने दुरुस्ती करून वाहतुकीस सुरक्षित बनविण्याची मागणी त्यांनी केली.

शिक्षण विभागाच्या आढाव्यावेळी तालुक्यातील केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरल्याची माहिती गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली. तर कृषी विभागाबाबत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तालुका कृषी कार्यालय शहरापासून दूर असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत असल्याचे सांगत हे कार्यालय पंचायत समितीच्या आवारात स्थलांतरित करण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला.

याशिवाय कृषी सहाय्यक आणि कृषी सेवक शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नसल्याची तक्रारही सदस्यांनी केली. कृषी विभागाशी संबंधित प्रश्नांवर स्वतंत्र बैठक आयोजित करण्याची मागणी सदस्य अपेक्षा मासये यांनी केली. विकासकामांतील त्रुटी, विविध विभागांच्या कामकाजातील उणिवा आणि जनतेच्या प्रश्नांवर सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राजापूर पंचायत समितीची मासिक सभा विविध मुद्द्यांवरील चर्चेमुळे गाजली. सभेच्या शेवटी शिवसेनेचे प्रतोद प्रसाद मोहरकर यांनी काही अभिनंदनाचे ठराव मांडले.