उड्डाणपूल उभारणीला सुरुवात
रत्नागिरी:- मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कुवारबाव येथे सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येतून आता वाहनचालकांची सुटका होण्याची चिन्हे आहेत. पाटबंधारे कार्यालय ते रेल्वेस्थानक फाट्यादरम्यान चारपदरी उड्डाणपुलाच्या उभारणीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. सुमारे ९२५ मीटर लांबीच्या या उड्डाणपुलासाठी ९५ कोटी ९५ लाख ७७ हजार ७७७ रुपये खर्च अपेक्षित असून, जून २०२८ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत ठेकेदार कंपनीला देण्यात आली आहे.
मिऱ्या ते नागपूर या चारपदरी महामार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. रत्नागिरी ते आंबा घाट या टप्प्यातील काम जवळपास पूर्ण झाले असून, काही किरकोळ कामे शिल्लक आहेत. ही कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
कुवारबाव येथे राष्ट्रीय महामार्ग विभागाने चौपदरीकरणाचे काम यापूर्वीच पूर्ण केले आहे. मात्र, या भागातील वाहतुकीची वाढती वर्दळ आणि रेल्वेस्थानक फाट्याजवळ होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन उड्डाणपुलाचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार आता पुलाच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. उड्डाणपुलाच्या नियोजनाचा विचार करून तयार करण्यात आलेला सध्याचा चौपदरी मार्ग भविष्यात सर्व्हिस रोड म्हणून वापरला जाणार आहे.
या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर कुवारबाव परिसरातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच रत्नागिरी शहरातून हातखंबा आणि पुढे जाणाऱ्या वाहनांना अधिक वेगाने प्रवास करता येणार आहे. त्यामुळे कुवारबावमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागण्याबरोबरच मिऱ्या-नागपूर महामार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.









