Saturday, May 2, 2026
spot_img
Home गुन्हेगारी किरकोळ कारणातून वृध्दाला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

किरकोळ कारणातून वृध्दाला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

दापोली:- तालुक्यातील गिम्हवणे येथील गोसावी वाडीत वरातीमधील वाद्यांचा आवाज कमी करण्यास सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका ५२ वर्षीय व्यक्तीला जोराने धक्का देऊन जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात धीरण विकास मंडपे आणि भास्कर विष्णू मंडपे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २९ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गिम्हवणे गोसावी वाडी येथे वरात चालली असताना फिर्यादी प्रभाकर दत्तू मंडपे यांनी वाद्यांचा आवाज कमी करण्याची विनंती केली होती. मात्र, याचा राग आल्याने आरोपी धीरण आणि भास्कर मंडपे यांनी फिर्यादीला अर्वाच्य भाषेत बोलून त्यांच्या छातीवर हाताने जोराने थाप मारली. या धक्क्यामुळे प्रभाकर मंडपे तोल जाऊन बाजूला असलेल्या खड्ड्यात पडले आणि गंभीर जखमी झाले.

यावेळी उपस्थित असलेल्या साक्षीदारांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही आरोपींकडून मारहाण करण्यात आली.या घटनेनंतर प्रभाकर मंडपे यांनी दापोली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली असून, पोलिसांनी ३० एप्रिल रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास आरोपींविरुद्ध कलम १२५(अ) आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदवला आहे. इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशी कृती करणे आणि व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस करत असून, वरातीमधील गोंधळामुळे उद्भवलेल्या या वादाची चर्चा सध्या दापोली तालुक्यात सुरू आहे.