चिपळूण:- जमिनीच्या वादातून पाळीव गुरे हकलल्याच्या कारणावरून एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेला काठीने मारहाण केल्याची घटना चिपळूण तालुक्यातील कळकवणे-ऐनाडवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी फिर्यादी दर्शना दत्ताराम शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून विनायक लवु शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ जुलै रोजी दुपारी १२.१५ च्या सुमारास घडली असून या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दर्शना शिंदे या आपल्या घराच्या परिसरात काम करत असताना आरोपीची पाळीव गुरे तेथे आली होती. फिर्यादी यांनी ही गुरे हकलण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी विनायक शिंदे तेथे आला आणि त्याने फिर्यादींना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सदर जमीन आपली असून यावर तुमचा काहीही हक्क नाही, असे म्हणत आरोपीने वाद घातला. वादाचे रूपांतर भांडणात झाल्यानंतर आरोपीने हातातील काठीने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या कोपरावर जोरदार फटका मारला.
इतकेच नव्हे, तर ‘हे तर काहीच नाही, तुला कापूनच टाकीन’ अशी धमकी देत आरोपीने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेनंतर फिर्यादी यांनी चिपळूण पोलीस स्थानकात धाव घेतली असता, पोलिसांनी आरोपी विनायक शिंदे याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.









