महाड तालुक्यात नांगलवाडी फाटा येथील घटना
दापोली:- रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावरील नांगलवाडी फाट्याजवळ कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दापोली येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दानिश पालटे (वय अंदाजे ३२ वर्षे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. रविवार, २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला असून या घटनेमुळे दापोली परिसरावर तीव्र शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दानिश पालटे हे दापोली येथून आपल्या दुचाकीवरून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. महाड तालुक्यातील नांगलवाडी फाटा परिसरात आले असता, समोरून भरधाव येणाऱ्या स्कोडा कार आणि त्यांच्या दुचाकीमध्ये अत्यंत भीषण समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला असून कारचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातातील गंभीर दुखापतींमुळे दानिश पालटे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
अपघातात ठार झालेले दानिश पालटे हे मूळचे दापोली तालुक्यातील आडे गावचे रहिवासी होते, तर सध्या ते दापोली येथील काळकाई कोड, हिल टॉप परिसरात वास्तव्यास होते.
मुंबईकडे जात असतानाच रस्त्यात त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने त्यांचे कुटुंबीय आणि परिचितांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एक मनमिळाऊ आणि परिचित तरुण अचानक अपघातात दगावल्याची बातमी पसरताच दापोली शहर आणि ग्रामीण भागातून हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला, दोन्ही वाहनांपैकी कोणाचे नियंत्रण सुटले होते का, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









