Tuesday, July 14, 2026
spot_img
Home रत्नागिरी कामबंद आंदोलनात सहभागी अडीच हजार शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कापणार

कामबंद आंदोलनात सहभागी अडीच हजार शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कापणार

रत्नागिरी:- विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी पुकारण्यात आलेल्या ‌‘शाळा बंद‌’ आंदोलनात सहभागी झालेल्या जिल्हा परिषदेच्या 2 हजार 437 शिक्षकांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. ‌‘नो वर्क, नो पे‌’ (काम नाही, वेतन नाही) या तत्त्वानुसार संबंधित शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कपात करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने दिले आहेत.

शिक्षक संघटनांनी विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी ‌‘शाळा बंद‌’ आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाला जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शिक्षकांनी प्रतिसाद दिल्याने अनेक शाळांमधील शैक्षणिक कामकाजावर परिणाम झाला होता.

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने आंदोलनाची गंभीर दखल घेतली. पूर्वपरवानगी न घेता सामूहिक रजा घेणे अथवा कर्तव्यावर गैरहजर राहणे हा प्रशासकीय शिस्तीचा भंग असल्याचे नमूद करत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले.

त्यानुसार आंदोलनात सहभागी झालेल्या एकूण 2,437 शिक्षकांचा एका दिवसाचा पगार ‌‘नो वर्क, नो पे‌’ तत्त्वानुसार कपात करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे जिल्हा परिषद शिक्षकांमध्ये खळबळ उडाली असून, शिक्षक संघटनांकडून या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे आंदोलन सुरू असताना प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे शिक्षक संघटना आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.