कशेडी घाटात टँकर दरीत कोसळून चालकाचा मृत्यू

खेड:- मुंबई – गोवा महामार्गावर गुरुवारी दि. २५ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कशेडी घाटात चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटून टँकर खोल दरीत कोसळल्याने टँकर चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

महामार्गावर कशेडी घाटात गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारा असिड भरलेला टँकर (एम एच ०४ सीजी ७९६२) २५० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात टँकरचे तुकडे तुकडे झाले असून, चालक जीवनलाल बारी (३३, रा. मध्य प्रदेश) जागीच ठार झाला. मुंबई येथून गोव्याच्या दिशेने केमिकल घेऊन निघालेला टँकर कशेडी घाट उतरत असताना एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्यामुळे महामार्गाच्या उजव्या बाजूला तब्बल २५० फूट खोल दरीत कोसळला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस कशेडी टॅपचे पोलीस उपनिरीक्षक घडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खेड नगर पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. दरीत कोसळलेल्या टँकरमधून टँकर चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी सायंकाळी उशिरपर्यंत अग्निशमन दलाचे जवान व पोलिस प्रयत्न करत होते.