कळझोंडी फाटा येथे कामाच्या कारणावरुन तरुणाला मारहाण

रत्नागिरी:- तालुक्यातील कळझोंडी फाटा येथे कामाच्या कारणावरुन एकाला दोघांनी मारहाण केली. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना 29 जून 2025 रोजी सायंकाळी 7.30 वा.सुमारास घडली.

अनिल चव्हाण, सुनिल पवार (दोन्ही रा.विजापूर, कर्नाटक) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात अशोक धनसिंग पवार (40, रा.मुळ रा.कर्नाटक सध्या रा.वाटद खंडाळा, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार,फिर्यादी आणि संशयित हे एकत्र काम बघण्यासाठी संगमेश्वर येथे गेले होते. परत येत असताना ते जाकादेवी येथे बारमध्ये एकत्र दारु पिल्यानंतर कामाच्या कारणावरुन त्यांच्यात दारुच्या नशेत भांडणास सुरुवात झाली. त्यानंतर फिर्यादी हे आपल्या दुचाकीवरुन घरी जात असताना लघूशंकेसाठी थांबले असताना संशयितांनी भांडणाचा राग मनात धरुन फिर्यादी अशोक पवारला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात फिर्यादी खाली पडल्यावर संशयितांनी त्याला याबाबत कोणाला काही सांगितल्यास तुला ठार मारुन टाकू अशी धमकी दिली. तसेच बाजूचा दगड हातात धरुन तो फिर्यादीच्या डोक्यात मागील बाजूस मारुन दुखापत केली. याप्रकरणी संशयितांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 118(1),115(2),351(3),352,3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.