कचराकुंडीत नवजात बालकाला टाकणाऱ्या अज्ञातावर गुन्हा

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील साळवी स्टॉप झोपडपट्टी परिसरातील एका कचराकुंडीत कुणीतरी अज्ञात व्यक्तीने नुकतेच जन्मलेले पुरुष जातीचे अर्भक उघड्यावर टाकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १० जानेवारी २०२६) सायंकाळी ५:४५ च्या सुमारास साळवी स्टॉप झोपडपट्टी येथील कचराकुंडीत एक नवजात बालक रडत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. पोटच्या गोळ्याला अशा निर्दयीपणे उघड्यावर सोडून दिल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. बालकाचा पूर्णतः परित्याग करण्याच्या उद्देशानेच त्याला तिथे सोडून देण्यात आले होते.

या घटनेची माहिती मिळताच चाईल्ड हेल्पलाईनच्या जिल्हा समन्वयक अन्वी अभिजित शिंदे (वय ३८, रा. धवल कॉम्प्लेक्स, माळनाका) यांनी तत्काळ धाव घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ९३ आणि बाल न्याय अधिनियम कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सध्या त्या नवजात बालकाला वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. हे बालक कोणाचे आहे आणि त्याला तिथे कोणी सोडले, याचा तपास पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे करत आहेत.