रत्नागिरी:- ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यास सांगून जास्त नफा देण्याचे आमिष दाखवून ९ लाख ३७ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२३ या कालावधीत एमआयडीसी येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुरुषोत्तम स्वर्णसिंग कलसी यांच्याशी संशयित टेलीग्राम आयडीने संपर्कात आला. त्याने ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यास सांगून नफा देण्याचे आमिष पुरुषोत्तम यांना दाखविले. संशयिताने वेगवेगळ्या बँक खात्यांची माहिती पाठवून त्यामध्ये ऑनलाईन व आरटीजीएसद्वारे फेडरर बँक, आयसीआयसी बँक, कॅनरा बँक व एचडीएफसी बँक या बँकेच्या खात्यात पैसे भरणा करण्यास सांगून ९ लाख ३७ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. पुरुषोत्तम यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी रविवारी (ता. १७) ग्रामीण पोलिसात तक्रार दिली.









