दापोली:- दापोली एसटी स्थानकाच्या पाठीमागे उर्दू शाळेजवळ बसला साईड देण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तीन जणांनी एसटी वाहक आणि चालकावर हल्ला केला. शासकीय कामात अडथळा आणत वाहकाला हाताबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवार, दिनांक १३ मे रोजी दुपारी १.२५ वाजण्याच्या सुमारास एसटी बस (क्र. MH 14 BT 2538) कोंडे-करंजाळी येथून दापोलीच्या दिशेने येत होती. बस उर्दू शाळेजवळ आली असता, साईड देण्याच्या कारणावरून आरोपींनी बस अडवली.
यावेळी आरोपींनी बस चालक आशिष रामचंद्र मळेकर यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाहक शिवनाथ बन्शी नाकाडे (वय ३४) हे मध्यस्थी करण्यास गेले असता, आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण केली. या हल्ल्यामुळे बस स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याप्रकरणी शेखर चंद्रकांत कालेकर (वय ४५ वर्षे, रा. दापोली), रंजित राजेंद्र यादव (वय १९ वर्षे, रा. दापोली), साहिल इरशाद शार्दुला (वय १९ वर्षे, रा. दापोली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेबाबत वाहक शिवनाथ नाकाडे यांनी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३२, १२१(१) आणि ३(५) अन्वये शासकीय कामात अडथळा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
भरदिवसा आणि सार्वजनिक ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्याचा एसटी प्रशासनाकडून निषेध व्यक्त करण्यात येत असून पोलीस अधिक तपास करत आहेत.









