रत्नागिरी:- रत्नागिरीतील मिरजोळे आणि उद्यमनगर एमआयडीसीसह काही ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा करणार्या पाच धरणांमध्ये सध्या 22.77 लाख क्युबिक मीटर एवढा पाणीसाठा असून, काजळी नदीवरील पाचही धरण पूर्ण क्षमतेने भरली आहेत. तर निवळी धरणामध्ये 14.50 लाख क्युबिक मीटर पाणीसाठी असून हा पाणीसाठी मे ते जून महिन्यापर्यत पुरेल या दृष्टीने एमआयडीसीकडून नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पाणी संकटातही उद्योगांना दिलासा मिळणार आहे.
लांजा व रत्नागिरी तालुक्यातून वाहणार्या काजळी नदीवर घाटीवळे, अंजणारी, असोडे, निवसर व हरचेरी या पाच ठिकाणी छोटी धरणे उभारण्यात आलेली आहेत. या धरणांची पूर्ण क्षमता 25.37 लाख क्युबिक मीटर पाणी साठवण्याची आहे. एमआयडीसीच्यावतीने उभारण्यात आलेल्या या धरणांपैकी हरचेरी येथे जुन्या धरणाच्या खालील बाजूलाच नवीन बंधारा बांधण्यात आलेला आहे. असोडे येथील नव्याने काम करण्यात आले आहे. नवीन धरणांमुळे पाणी साठ्यात वाढ झाली झाली.
पाऊस संपल्यानंतर या धरणामध्ये प्लेट व माती टाकून याची पाणी साठवणूक क्षमता वाढवण्यात येते. त्यामुळे मोठ्याप्रमाणात वाहून जाणार्या पाण्याचा साठा वाढतो. दरवर्षी वाढीव साठा करण्यासाठी जवळपास 17 ते 18 लाखाचा खर्च एमआयडीसीला येतो. याठिकाणी पाच ते सहा महिने देखरेखीकसाठी वॉचमनही ठेवला जातो.
सध्या या पाचधरणांमध्ये 25.37 लाख क्युबिक मीटर एवढा पाणीसाठा असून मृतसाठा वगळून वापरात येणारा 22.772 लाख क्युबिक मीटर पाणीसाठा आहे. यामध्ये हरचेरी धरणामध्ये 6.66 लाख क्युबिक मीटर, निवसरमध्ये 2.71 लाख क्युबिक मीटर, असोडेमध्ये 2.7 लाख क्युबिक मीटर, अंजणारीमध्ये 7.44 लाख क्युबिक मीटर तर घाटीवळेत 3.262 लाख क्युबिक मीटर एवढा पाणीसाठा आहे. निवळी धरणामध्ये 14.50 लाख क्युबिक मीटर पाणीसाठा आहे. यामुळे जिंदल व अन्य प्रकल्पांसह जयगड प्रादेशिक नळपाणी योजना आणि या पाईप लाईनवर अवलंबून असणार्या अन्य गावांनाही मे अखेरपर्यत दिलासा मिळणार आहे.
राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी तालुक्यातील एमआयडीसी व ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणार्या धरणांचा पाणीसाठ्याचा आढावा घेत आहेत. नागरिकांना पाणी देण्याबरोबरच उद्योगही व्यवस्थित सुरु राहतील यासाठी मागील दोन महिन्यापासून अधिकारी वर्गांना नियोजनाच्या सूचना दिल्या आहेत.









