रत्नागिरी:- राज्यात सायबर गुन्हेगारांनी आता थेट वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मंत्र्यांनाच लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचा मोबाईल फोन हॅक करून त्यांच्या व्हॉट्सॲपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आल्याची घटना ताजी असतानाच, राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनीही आपला मोबाईल, फेसबुक आणि ट्विटर (एक्स) अकाऊंट हॅक झाल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. सामान्य नागरिकांसोबतच आता पोलीस आणि मंत्र्यांची सोशल मीडिया खातीही हॅकर्सच्या निशाण्यावर आल्याने सायबर सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
मंगळवारी सायंकाळी ४.४६ वाजण्याच्या सुमारास पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर अचानक अश्लील व्हिडीओ क्लिप्स दिसू लागल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली. अवघ्या काही मिनिटांत त्यांच्या खात्यावरून सुमारे १५ ते २० आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित करण्यात आले होते. हा धक्कादायक प्रकार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच सायबर यंत्रणा तातडीने सतर्क झाली; सुमारे ५० मिनिटे ते एक तास हे व्हिडीओ स्टेटसवर राहिल्यानंतर सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास संबंधित व्हॉट्सॲप खाते बंद करून सर्व व्हिडीओ डिलीट करण्यात पोलिसांना यश आले, सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
दरम्यान, या घटनेवर भाष्य करताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्वतःला आलेला असाच कटू अनुभव कथन केला. आपला मोबाईल तसेच फेसबुक आणि ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती देतानाच, या सायबर हॅकिंगच्या माध्यमातून आपल्यालाही कोणालातरी ३ हजार ५०० रुपये द्यावे लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाढते तंत्रज्ञान आणि मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेले सायबर हॅकर्स यामुळे अशा घटना घडत असून पोलीससुद्धा शेवटी माणूसच आहेत, त्यांच्याकडे कोणतीही वेगळी शक्ती नाही, त्यामुळे त्यांचाही मोबाईल हॅक झाला असावा, अशी प्रतिक्रिया देत मंत्री सामंत यांनी सायबर गुन्हेगारांच्या वाढत्या धाडसाकडे लक्ष वेधले आहे.









