एटीएम फोडणारा म्होरक्या प्रेयसीसह पोलिसांच्या जाळ्यात 

रत्नागिरी:- चिपळूण शहरातील भोगाणे येथील युनियन बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून टोळीतील पाचजण मुंबईला गेले. तेथे पैसे वाटप झाल्यानंतर इरफान खान आपल्या प्रेयसीला घेवून  मौजमजेसाठी गोव्यात गेला. त्याचे दोघे साथिदारही त्याच्यासोबत होते. मात्र प्रेयसीला घेवून आलेला इरफान साथिदारांसह पोलीसांच्या जाळ्यात सापडल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.

चिपळूण शहरातील एटीएम फोडून आतिल १४ लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली होती. हा प्रकार १ सप्टेंबरच्या पहाटे पाचजणांच्या टोळीने केल्याचे पुढे आले आहे. त्यानंतर ते खासगी गाडीने गुहागर बायपास मार्गे मुंबईच्या दिशेला रवाना झाले. पोलीसांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय महामार्गाचा वापर करता पर्यायी रस्त्याने वाहतूक केल्याचे पुढे आले आहे. मुंबईला जाताना पाच जणांनी चौदा लाख रुपयांचे वाटप करुन प्रत्येकाचा हिस्सा वाटून घेतला. मोठ्याप्रमाणात पैसे हाती आल्यानंतर इरफानने आपल्या प्रेयसी सोबत गोव्याला जाण्याचा प्लॅन केला होता. इरफान सोबत वासिफ, शादाब हे दोघेही गोव्याला आले.

पोलीसांच्या तपासात संशयीत आरोपी निश्चित झाले होते. त्यांचा नेमका ठाव ठिकाण कुठे आहे, याचा शोध सुरु असतानाच जिल्हा पोलीसांच्या पथकाला गोव्यात त्यांचे लोकेशन मिळाले. त्यासाठी पोलीसांनी वेगवेगळ अत्याधुनिक यंत्रणांचा वापर केला. रत्नागिरी पोलीसांचे पथक तिघांना ताब्यात घेण्यासाठी गोव्यात पोहचल्यानंतर तेथे इरफान सोबत त्याची प्रेयसी व अन्य एक मुलगी आढळून आली. यावेळी इरफान प्रेयसीसाठी गोव्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे इरफान व त्यांच्या सोबत गोव्यात अन्य ठिकाणी फिरण्यासाठी गेलेले त्याचे दोन साथिदार पोलीसांच्या जाळ्यात अडकल्याची माहिती पुढे आली आहे.