Saturday, July 4, 2026
spot_img
Home गुन्हेगारी एक हजाराचा ड्रेस पडला दहा लाखांना!

एक हजाराचा ड्रेस पडला दहा लाखांना!

मिरजोळे येथील महिलेची तब्बल १० लाखांची ऑनलाईन फसवणूक

रत्नागिरी:- सोशल मीडियावरील जाहिरातीच्या मोहाला बळी पडलेल्या एका महिलेला ऑनलाईन फसवणुकीचा मोठा फटका बसला आहे. मिरजोळे येथील सौ. सई प्रथमेश बांडावे (वय ३७) यांची अज्ञात भामट्यांनी तब्बल १० लाख ३१ हजार २०९ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४ फेब्रुवारी २०२६ ते १८ जून २०२६ या कालावधीत ही फसवणूक घडली. फिर्यादी महिलेने इन्स्टाग्रामवर एक ड्रेसची जाहिरात पाहिली होती. त्या जाहिरातीमधील व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधून त्यांनी ड्रेस ऑर्डर केला आणि १००० रुपये गुगल पेद्वारे भरले. त्यानंतर भामट्यांनी ई-कार्ट कंपनीच्या नावाखाली फिर्यादींना व्हॉट्सॲप कॉल केला. तुमचे पार्सल आले आहे, असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर पार्सल मिळवण्यासाठी गव्हमेंट चार्जेस आणि इतर विविध शुल्काच्या नावाखाली या भामट्यांनी महिलेकडून वेळोवेळी तब्बल १० लाख ३१ हजार २०९ रुपये उकळले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता या अज्ञात आरोपींचा तांत्रिक पुराव्यांच्या आधारे शोध घेत आहेत. ऑनलाईन खरेदी करताना अनोळखी लिंक किंवा क्यूआर कोडवर व्यवहार न करण्याचे आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येत असूनही अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.