Sunday, May 31, 2026
spot_img
Home दापोली ट्रक-कारच्या भीषण अपघातात दापोलीतील मायलेकींचा जागीच मृत्यू

ट्रक-कारच्या भीषण अपघातात दापोलीतील मायलेकींचा जागीच मृत्यू

महामार्गावर पोलादपूर नजीक अपघात; वडील-मुलगा गंभीर जखमी

पोलादपूर:- मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील लोहारे हद्दीत शनिवारी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील माय-लेकींचा जागीच मृत्यू झाला, तर वडील-मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. हे कुटुंब अहिल्यानगर येथून दापोलीच्या दिशेने प्रवास करत असताना हा दुर्दैवी अपघात घडला.

​मिळालेल्या माहितीनुसार, अनिल रावसाहेब मरकड (वय ४४) हे आपल्या कुटुंबासह कारने (एमएच ०८ एएन २४३९) अहिल्यानगर येथून दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडे निघाले होते. पोलादपूर तालुक्यातील लोहारे हद्दीत महामार्गालगत एक आयशर ट्रक (एमएच ०४ एलवाय १६३८) उभा होता. ट्रकचालक जवळच असलेल्या नदीकिनारी शौचास गेला असताना, भरधाव कारने महामार्ग सोडून थेट उभ्या ट्रकच्या मागील भागाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा चक्काचूर झाला.

​या अपघातात अनिल मरकड यांच्या पत्नी सुवर्णा मरकड (वय ४५) आणि मुलगी अनुश्री (वय १६) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सुवर्णा मरकड या दापोली येथील भारतीय स्टेट बँकेत कर्मचारी होत्या. कारचालक अनिल मरकड आणि त्यांचा ५ वर्षांचा मुलगा चिन्मय मरकड हे गंभीर जखमी झाले आहेत. अनिल मरकड यांना अधिक उपचारासाठी मुंबईला, तर चिन्मयला महाड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

​अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, उपनिरीक्षक सतीश पवार आणि नरवीर व काळभैरवनाथ रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली. मदतकार्य करून जखमींना तातडीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनीही घटनास्थळी आणि रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. याप्रकरणी पोलादपूर पोलीस पुढील तपास करत आहेत.
​या अपघातामुळे दापोली आणि कृषी विद्यापीठ परिसरात शोककळा पसरली असून, एका हसत-खेळत असलेल्या कुटुंबावर नियतीने मोठा घाला घातला आहे.