रत्नागिरी:- ई-पॉस मशीनमध्ये वारंवार निर्माण होणाऱ्या तांत्रिक समस्यांवर प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याच्या निषेधार्थ राज्यभरातील रास्त भाव धान्य दुकानदारांनी सोमवार, दि. ७ सप्टेंबर रोजी ई-पॉस मशीन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनाला रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक-मालक संघटनेने शंभर टक्के पाठिंबा दिला. या आंदोलनामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील रेशन दुकाने सोमवारी दिवसभर बंद होती.
या आंदोलनाबाबत जिल्हा संघटनेने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन दिले. केंद्र शासनाकडून एनआयसीच्या माध्यमातून ई-पॉस मशीनला पुरविण्यात येणारी इंटरनेट सर्व्हर सेवा गेल्या काही महिन्यांपासून वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे धान्य घेण्यासाठी रास्त भाव धान्य दुकानांमध्ये येणाऱ्या लाभार्थ्यांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेकदा सर्व्हरअभावी धान्य न मिळाल्याने लाभार्थ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. ई-पॉस मशीनच्या तांत्रिक अडचणींमुळे दुकानदार आणि ग्राहकांमध्ये विनाकारण वाद निर्माण होत असून, या समस्येचा फटका दुकानदारांसह लाभार्थ्यांनाही बसत आहे. या गंभीर प्रश्नावर राज्य फेडरेशनने २१ ऑगस्ट रोजी शासनाला लेखी निवेदन देऊन चर्चा केली होती. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने दुकानदारांमध्ये नाराजी वाढली आहे.
दरम्यान, १ सप्टेंबर रोजी झालेल्या रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक-मालक संघटनेच्या बैठकीत राज्य फेडरेशनच्या आंदोलनाला जिल्ह्यातून पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सोमवार, ७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदार ई-पॉस मशीन बंद ठेवून धान्य वितरण न करण्याचा निर्णय घेण्यात आला. ई-पॉस मशीनमधील तांत्रिक समस्या तातडीने दूर करून लाभार्थ्यांना सुरळीत धान्य वितरणाची व्यवस्था करावी, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात आली आहे.









