Tuesday, September 8, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी शहरात गणेशोत्सवानंतर अतिक्रमण हटाव मोहीम

रत्नागिरी शहरात गणेशोत्सवानंतर अतिक्रमण हटाव मोहीम

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील फूटपाथ आणि रस्त्यांवरील तात्पुरती अतिक्रमणे काढण्याची मोहीम आता गणेशोत्सवानंतर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष, नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत यावर एकमत झाले.

शहरातील ज्या ठिकाणी विकासकामे प्रस्तावित आहेत, तेथील खोके, टपऱ्या आणि हातगाड्या हटवल्या जाणार आहेत. व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी नगरपरिषदेने दुकानदारांना स्वतःहून अतिक्रमणे हटवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अनेकांनी टपऱ्या हलवल्या, मात्र प्रतिसाद न देणाऱ्या दुकानदारांच्या टपऱ्या जप्त करण्यात आल्या. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतील निर्णयानुसार पोलीस बंदोबस्तात सलग तीन दिवस ही मोहीम राबवण्यात आली. या कारवाईदरम्यान टपरीधारक व फेरीवाल्यांनी लोकप्रतिनिधींकडे धाव घेत कारवाई थांबवण्याची विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या विशेष बैठकीत, गणेशोत्सवाचा सण लक्षात घेता ही मोहीम सण संपेपर्यंत स्थगित ठेवून त्यानंतर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत कोकणनगर येथील गाळे बांधकामाच्या वादावरही सविस्तर चर्चा झाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक केतन शेट्ये यांनी याप्रकरणी भूमिका मांडली. या विषयावर जोपर्यंत योग्य व अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत कोकणनगरात कोणत्याही नव्या कामाला हात लावला जाणार नाही, असाही निर्णय घेण्यात आला.