रत्नागिरी:- तालुक्यातील आरे-वारे बीच रस्त्यावर दोन वाहनातील चार संशयितांनी मुंबई येथील कुटुंबावर चाकून हल्ला केला. या मध्ये दोघे जखमी झाले. चार अज्ञातांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता. २) सायंकाळी पाचच्या सुमारास आरेवारे बीच रस्त्यावर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रविण हरिश्चंद्र कोरे (वय ४८, रा. ७०७ विक्टर सेक्टर बिल्डींग, डी-मार्ट शेजारी, मीठाघर रोड, कांदरपाडा, दहिसर पश्चिम मुंबई) हे त्यांच्या कुटुंबियांसह रत्नागिरीत फिरण्यासाठी आले होते. शनिवारी सायंकाळी ते आरे-वारे बीच येथे गेले होते. त्यावेळी दोन मोटार (क्र. एमएच-४६ डीए ९७८४) व मोटार (क्र. एमएच-४६ सीइ ७४८५) मधील चार अनोळखी यांनी फिर्यादी हे गाडी चालवत असताना रस्त्यात वाकडी तिकडी चालवून अडथळा निर्माण केला. तसेच फिर्यादी यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ केली. त्यावेळी फिर्यादी यांनी विचारणा केली असता त्याचा राग मनात धरुन फिर्यादी प्रविण कोरे यांच्या संशयितांनी त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या एकाने चाकू काढून मारण्यासाठी अंगावर धावत आला. त्यामुळे फिर्यादी यांचा भाऊ गिरीष यांच्या डाव्या हाताची करंगळी मुरगळली व पुतण्या सार्थक याच्या छातीवर मारुन दुखापत केली. या झटापटीत फिर्यादी यांच्या गळ्यातील सहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व त्यामध्ये असलेले नऊ ग्रॅम वजनाची चांदीची अंगठी पडून नुकसान झाले. या झटापटीनंतरही संशयितांनी फिर्यादी यांच्या गाडीचा पाठलाग केले. व तुमच्या गाडीचा नंबर पाहिला आहे. तुम्हाला शोधून ठार मारु अशी धमकी दिली. या प्रकरणी प्रवीण कोरे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहे.









