स्थानिकांच्या मदतीने सुटका
रत्नागिरी:- रत्नागिरीच्या निसर्गरम्य आरेवारे बीचवर पर्यटनाचा थरार एका क्षणात चिंतेत बदलल्याची घटना घडली आहे. आरेवारे बीचवरील प्रसिद्ध झिपलाईनचा आनंद घेत असलेले एक तरुण जोडपे समुद्राच्या वर लाइनच्या मध्यभागी अचानक अडकून पडले. डोळ्यांसमोर खाली खवळलेला अथांग समुद्र आणि मदतीसाठी केलेली कसरत यामुळे काही काळ हवेतच थरकाप उडाला होता. अखेर दुसऱ्या रस्सीच्या सहाय्याने दोघांना ओढून सुरक्षितपणे सुखरूप खाली आणण्यात आले, तेव्हा सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
आरेवारे बीचजवळ असलेल्या उंच कड्यावरून थेट खाली बीचच्या दिशेने ही साहसी झिपलाईन सुविधा पर्यटकांसाठी सुरू करण्यात आली आहे. या रोमांचक खेळात पर्यटक उंच कड्यावरून सेफ्टी हार्नेसच्या मदतीने रेषेवरून सुसाट वेगाने खाली घसरत येतात. या प्रक्रियेत समुद्रावरून हवेत सरकताना मिळणारा थरार अनुभवण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते.
आज संध्याकाळच्या सुमारास पर्यटकांची नेहमीप्रमाणेच गर्दी जमली होती. याच दरम्यान एक कपल या झिपलाईनवरून सुसाट सुटले; परंतु नेमके कड्यापासून सुटल्यानंतर ते दोघेही समुद्राच्या बरोबर मध्यभागी येताच हवेतच थांबले. यांत्रिक बिघाडामुळे किंवा हवेच्या दबावामुळे ते पुढे सरकण्याऐवजी लाइनवरच अडकून पडले.
खाली निळाशार समुद्र आणि लाटांचा आवाज, तर वर हवेत अडकल्यामुळे सदर जोडप्याची प्रचंड तारांबळ उडाली. त्यांचा हा थरार पाहून खाली बीचवर उपस्थित असलेल्या पर्यटकांच्या काळजाचा ठोका चुकला. अनेक पर्यटक आणि उपस्थितांनी मदतीसाठी धाव घेतली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत साहसी खेळाचे संचालन करणाऱ्या यंत्रणेने तत्परता दाखवली. तातडीने दुसऱ्या एका मजबूत रस्सीची जुळवाजुळव करण्यात आली. खाली असलेल्या कर्मचाऱ्यांनी व स्थानिकांनी दुसऱ्या रस्सीच्या साहाय्याने अडकलेल्या पर्यटकांपर्यंत पोहोचून त्यांना अत्यंत शर्थीने आणि कौशल्याने खेचत सुरक्षितपणे किनारपट्टीवर ओढून आणले. सुदैवाने या थरारक घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही. परंतु, काही मिनिटे हवेत अडकून पडल्याने पर्यटकांचा थरकाप उडाला होता.









