आरवली, सावर्डे येथे गांजा जप्त; तिघांना अटक

संगमेश्वर:- तालुक्यातील आरवली आणि चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत गांजा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई ०३ मे रोजी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, ०३ मे रोजी सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास आरवली उड्डाणपुलाखालील रस्त्यावर मोटारसायकल ( एमएच०८/एजे/३३९८) वर सुभाष सायबू लोढे (वय ४५) आणि अमितकुमार नागेश्वर साव (वय ३०) हे दोघे संशयास्पद अवस्थेत बसलेले आढळले. पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्या ताब्यात २७ हजार ६०० रुपये किमतीचा ५०४ ग्रॅम हिरवट काळपट रंगाचा गांजा तसेच ५० हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली.

दुसरी कारवाई चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील आडरेकर मोहल्ला येथे ०३ मे २०२५ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत यासीन महामूद काद्री (वय ५३) याच्या ताब्यातून नमूद वर्णनाचा गांजा जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दोन्ही घटनांमधील एकूण ७७ हजार ६०० रुपये किमतीचा गांजा आणि मोटारसायकल जप्त केली आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.