रिफायनरीला विरोध करू नका; पोलिसांत तक्रार
रत्नागिरी:- ”रिफायनरीमे हमारा पैसा लगा हुआ है, अपोज (विरोध) मत करना। नहीं तो तुझे और तेरे परिवारको ठोक देंगे।’ अशी धमकी राजापूर विधासनभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना फोनवरून देण्यात आली. यामुळे त्यांना व कुटुंबीयांना धोका निर्माण झाला आहे. साळवी यानी अज्ञाताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.
याबाबत पोलिससूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, आमदार राजन साळवी सेनेचे आमदार म्हणून २००९ पासून कार्यरत आहेत. नाणार रिफायनरी प्रकल्पाला त्यानी स्थानिक जनतेच्या सोबत राहून विरोध दर्शवला होता. त्यामुळे हा प्रकल्प रद्द झाला. आता पु्न्हा समर्थकांनी प्रकल्प होण्याबाबत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या अनुषंगाने मोबाईल क्र. ९२६५४४०५७६ या फोनवरून आमदार राजन साळवी यांच्या मोबाईल क्र. ९९७०१६९०२५ यावर १० जानेवारीला संध्याकाळी साडेसात वाजता ही धमकी आली. अज्ञात इसमाने धमकी दिली की, ‘रिफायनरीका काम मत रोकना, बुरा हो जाएगा, चल फोन रखो।’ एवढे बोलून त्याने फोन बंद केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याच दिवशी रात्री ११ वाजून १४ मिनिटाच्या सुमारास परत फोन केला. ‘रिफायनरीमे हमारा पैसा लगा हुआ है, अपोज मत करना, नहीं तो तुझे और तेरे परिवारको ठोक देंगे।’ अशी धमकी अज्ञाताने दिली. त्यामुळे आमदार राजन साळवी यांनी १२ जानेवारीला शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल केली असून अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.
धमकीच्या चौकशीची मागणी
आमदार राजन साळवींना जीवे मारण्याची धमकी आली आहे. राजन साळवी हे कडवे शिवसैनिक आहेत, अशा फुसक्या धमक्यांना ते घाबरत नाहीत. आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्या सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी मी गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांच्याकडे करणार आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.









