रत्नागिरी:- लांजा तालुक्यातील आडवली येथील ७५ वर्षीय वृद्धाने दीर्घ आजारपणाला कंटाळून उंदीर-घुस मारण्याचे विषारी औषध प्राशन केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत सीताराम भागोजी खाके (वय ७५, रा. आडवली, ता. लांजा) हे मागील काही काळापासून आजारपणाने त्रस्त होते. यातूनच त्यांनी ०५ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी उंदीर-घुस मारण्याचे औषध प्राशन केले. काही वेळानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, लांजा येथे दाखल केले.
तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रकृती गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना अधिक उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेद्वारे सिव्हील हॉस्पिटल, रत्नागिरी येथे हलवण्यास सांगितले. त्यानुसार त्यांना सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता, अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना ०५ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी मयत व्यक्तीचे सुपुत्र शशिकांत सीताराम खाके यांनी दिलेल्या खबरीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे (आमृ. क्रमांक ४०/२०२६) नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.









