Saturday, May 23, 2026
spot_img
Home लांजा आंजणारी पुलाजवळ कंटेनर उलटून चालकाचा मृत्यू

आंजणारी पुलाजवळ कंटेनर उलटून चालकाचा मृत्यू

लांजा:- मुंबईहून गोव्याच्या दिशेने निघालेला मालवाहू कंटेनर आंजणारी पुलाजवळील वळणावर उलटून झालेल्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या दुर्घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ एकेरी मार्गाने सुरू ठेवावी लागली. या अपघातात सुरेंद्रकुमार दुबे (वय ४८, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. वडाळा, मुंबई) यांचा मृत्यू झाला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुबे हे डायपर निर्मितीसाठी लागणारे कच्चे साहित्य घेऊन एमएच ४६ बीबी २३७० क्रमांकाच्या कंटेनरमधून गोव्याच्या दिशेने निघाले होते. २४ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास आंजणारी पुलाच्या आधी असलेल्या तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर उलटला. अपघात इतका भीषण होता की चालक सुरेंद्रकुमार दुबे हे केबिनमध्येच अडकून पडले. घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांनी तत्काळ ११२ आपत्कालीन सेवेला संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. ही माहिती मिळताच लांजा पोलिस स्थानकातील हवालदार विलास जाधव, दिनेश आखाडे आणि सुयोग वाडकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. केबिनचे पत्रे वाकवून मोठ्या प्रयत्नांनंतर चालकाला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना प्राथमिक उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

दरम्यान, अवंतिका ट्रान्स्पोर्ट कंपनीचे दोन कंटेनर एकाच वेळी गोव्याच्या दिशेने रवाना झाले होते. सुरेंद्रकुमार दुबे यांचा कंटेनर पुढे होता, तर त्यांच्या मागोमाग कंपनीचाच दुसरा कंटेनर चालक कोमल भूअलीसिंग येत होता. आंजणारी येथे पोहोचताच त्याला अपघात झाल्याचे निदर्शनास आले. त्यानेच तत्काळ पोलिसांना माहिती देत घटनेची फिर्याद नोंदवली. या अपघाताची नोंद लांजा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.