रत्नागिरी:- आंघोळीसाठी पाणी गरम करत असताना अचानक आगीचा भडका उडून गंभीररीत्या भाजलेल्या एका ६७ वर्षीय वृद्धेचा रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शेवंती बाळकृष्ण चौधरी (वय ६७, रा. मोठी गोडीबाव, हर्णे, ता. दापोली) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ मार्च रोजी शेवंती चौधरी या आपल्या घरी आंघोळीसाठी पाणी गरम करत होत्या. यावेळी अचानक आगीचा मोठा भडका उडाला आणि त्यांच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. यामध्ये त्या गंभीररीत्या भाजल्या गेल्या.
घटनेनंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने हर्णे येथील डॉ. अंतले यांच्याकडे नेले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना अधिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, दापोली येथे हलवण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना १०८ रुग्णवाहिकेने सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले.
जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना, ५ मार्च रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद ९ मार्च रोजी दुपारी १२ वाजता रत्नागिरी पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. १९४ अन्वये करण्यात आली आहे.









