अवैध खैर लाकूड वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी:- जिल्ह्यातील अवैध वृक्षतोड व बेकायदेशीर लाकूड वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत असून त्याअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत खैराच्या झाडांचे १८१ नग लाकूड तसेच दोन चारचाकी वाहने असा एकूण ११ लाख ७१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक जी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध वृक्षतोड व लाकूड वाहतूक रोखण्यासाठी नियमित गस्त व तपासणी सुरू आहे. त्याच अनुषंगाने दि. ७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.१० वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना मौजे निवळी बावनदी, ता. व जि. रत्नागिरी येथील रस्त्यावर संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली.

या वेळी बोलेरो पिकअप (एमएच-१४-एचजी-७३३८) व टाटा योद्धा (एमएच-०८-एपी-४३३९) या दोन वाहनांमध्ये खैर जातीच्या झाडांची लहान-मोठ्या आकारातील एकूण १८१ नग लाकडे विनापरवाना वाहतूक करताना आढळून आली.

या प्रकरणी वाहनचालक अजित गंगाराम चव्हाण (वय २६, रा. आंबडस, ता. खेड), अरबाज हमीद सुर्वे (वय ३४, रा. गवळीवाडी, घाणेखुंट, ता. खेड) व त्याच्यासोबत असलेला अक्षय टराजू चव्हाण (वय २८, रा. भिंगळोली, ता. मंडणगड) हे खैराची झाडे तोडून चोरी करून त्यांची बेकायदेशीर वाहतूक करत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.

या कारवाईदरम्यान खैराची १८१ नग लाकडे व दोन वाहने असा एकूण ११ लाख ७१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या तिघांविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२), ३१७(२), ३(५) तसेच भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१(२)(ब) व ४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस पथकाने पेट्रोलिंगदरम्यान तत्परतेने करून अवैध वृक्षतोड व वाहतूक रोखण्यात यश मिळविले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली श्रे. पो.उपनि. प्रशांत बोरकर, स.पो. फौजदार सुभाष भागणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन डोमणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल भैरवनाथ सवाईराम व चालक पोलीस कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांनी केली.