खेड न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; ‘पोक्सो’सह विविध कलमान्वये आरोपीला ठोठावली शिक्षा
खेड:- शालेय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी खेड येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी रोहन शंकर पालकर (वय २३, रा. खारी-सुसेरी, ता. खेड) याला दोषी धरून २० वर्षे सश्रम कारावासाची कठोर शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश पी. एस. चांदगुडे यांनी बुधवारी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
कोविड काळात शाळा बंद असल्याने ऑनलाईन क्लासेस सुरू होते. यादरम्यान पीडित बालिका अभ्यासासाठी आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली होती. याचाच फायदा घेत आरोपी रोहन पालकर याने घरात कोणी नसल्याचे पाहून पीडितेवर जबरदस्तीने अत्याचार केला. तसेच, ही बाब कोणाला सांगितल्यास तिला आणि तिच्या पालकांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीमुळे पीडिता दीर्घकाळ गप्प होती. मात्र, प्रकृतीच्या काही तक्रारींमुळे आईने तिला डॉक्टरांकडे नेले असता, वैद्यकीय तपासणीत हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यानंतर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. पीडितेची साक्ष, वैद्यकीय पुरावे आणि सर्वात महत्त्वाचा असलेला डी.एन.ए. अहवाल या गुन्ह्यात निर्णयात्मक ठरला. न्यायालयाने आरोपीला भा.द.वि. ३७६ (२) (j) (n), ३७६ (३) आणि ३७६ (f) या अंतर्गत प्रत्येकी २० वर्षे सश्रम कारावास आणि ५००० रुपये दंड, पोक्सो कलम ४ आणि ६ अंतर्गत २० वर्षे सश्रम कारावास आणि ५००० रुपये दंड कलमान्वये दोषी ठरवले. तसेच पोक्सो कलम ८, १०, १२ आणि भा.द.वि. ५०६ अन्वये देखील कारावास व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या सर्व शिक्षा आरोपीला एकत्रितपणे भोगायच्या आहेत.
या प्रकरणात सरकारी वकील अॅड. सौ. मृणाल जाडकर यांनी सरकार पक्षाच्या बाजूने प्रभावी युक्तीवाद केला. खेड पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली झेंडे यांनी या प्रकरणाचा तपास केला, तर कोर्ट पैरवी पोलीस कॉन्स्टेबल चंद्रमुनी ठोके यांनी या कामी सहकार्य केले.









