अपघातातील जखमी प्रौढ महिलेचा मृत्यू

चिपळूण:- कारने दुचाकीला धडक देऊन अपघात झाल्याची घटना २५ रोजी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील निर्व्हळ घाटातील रस्त्यावर घडली. यात गंभीररित्या जखमी झालेल्या प्रौढ महिलेचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला. या प्रकरणी कार चालकावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल अनिल काटकर (सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद अभिषेक नरेश डांगे (२७, गुहागर) याने दिली. तर नलिनी नरेश डांगे (४७, गुहागर) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक डांगे व त्याची आई नलिनी डांगे असे दुचाकीने बेलदूर ते सोनगांव-लोटे येथे जात होते. असे असताना ते चिपळुणातील निव्र्व्हळ घाट येथे आले असता त्याच्या पाठीमागून आलेल्या कारने त्याच्या दुचाकीला धडक दिली.

हा अपघात घडताच अभिषेक डांगे व नलिनी डांगे रस्त्यावर कोसळल्या. यात नलिनी या गंभीर जखमी झाल्याने त्या बेशुद्ध झाल्या. त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरु असताना २७ डिसेंबर रोजी ७.३० वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या अपघातात अभिषेक हे देखील जखमी झाला असून याच्या दुचाकीचे नुकसान झाले. या अपघातप्रकरणी विशाल काटकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.