सिन्नर येथील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर खेड जवळील कामाक्षी पेट्रोल पंपाशेजारी एका अपघातावरून वाद होऊन पाच जणांनी मिळून एका चालकाला लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील पाच जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मे रोजी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. फिर्यादी चालक शैलेश जयसिंग गुरव (वय ३६, रा. आरवली, गुरववाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) हे आपल्या ताब्यातील गाडी (क्र. MH-14 JL 5201) घेऊन मुंबईच्या दिशेने जात होते.
ते खेड येथील कामाक्षी पेट्रोल पंपाजवळ आले असता, पाठीमागून येणाऱ्या कार (क्र. MH-48 AW 7093) च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने, निष्काळजीपणे आणि हयगयीने चालवून गुरव यांच्या गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले.
अपघात झाल्यानंतर कारमधील संशयित आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवला. अपघाताच्या रागातून आरोपींनी फिर्यादी शैलेश गुरव यांना पोटावर, तोंडावर आणि गुप्तभागावर लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत चालक शैलेश गुरव हे जखमी झाले आहेत.
या प्रकरणी चालक शैलेश गुरव यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संशयित आरोपी सुमित विलास गांगुर्डे, मिना विलास गांगुर्डे, अनिता भैरवनाथ अहिर, भैरवनाथ सुखदेव अहिर आणि सोमनाथ मास्ती अभंग (सर्व रा. सिन्नर, जि. नाशिक) यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब), १८९(१), १८९(२), १९१(१), १९१(२), १९० सह मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









