अनैतिक व्यवसाय प्रकरणी संशयिताला पोलीस कोठडी

रत्नागिरी:- चार तरूणींकडून अनैतिक व्यवसाय करवून घेणाऱ्या अरमान करीम खान (रा.कोकणनगर) याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलीस कोठडीच्या कालावधीत अरमानने केव्हापासून अनैतिक व्यवसाय सुरू केला होता हे पोलिसांच्या तपासात उघड होणार आहे. परंतु महामार्गानजिक असलेल्या लॉजवर सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायाची माहिती स्थानिक पोलिसांना कशी मिळाली नाही? असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

मिऱ्या-नागपूर महामार्गावरील कारवांचीवाडी नजिक गौरव लॉजवर छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखेसह ग्रामीण पोलिसांनी चार तरूणींची सुटका केली होती. तर त्यांना अनैतिक व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या अरमान करीम खान याला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश आहेत.