मुख्य सूत्रधार अद्याप फरार
रत्नागिरी:- शहरानजीकच्या खेडशी येथील गौरव लॉजवर चालवण्यात येत असलेल्या अनैतिक व्यवसायातील अन्य दोन संशयितांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयाने शुक्रवारी पोलिस कोठडी सुनावली आहे. परंतू अजूनही या प्रकरणातील मुख्य सूत्रधार फरार असून ग्रामीण पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.
यश कांबळे आणि शुभम खडपे (दोन्ही रा.रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. याप्रकरणात यापूर्वी ग्रामीण पोलिसांनी अरमान करीम खान (रा. कोकणनगर, रत्नागिरी ) याला अटक केली होती. तो आता न्यायालयीन कोठडीत आहे. काही दिवसांपूर्वी आकाशवाणी केंद्रासमोरील गौरव लॉजवर वेश्या व्यवसाय चालवण्यात येत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि ग्रामीण पोलिसांनी एक पथक तयार केले. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार या पथकामार्फत एक डमी गिर्हाईक पाठवून खेडशी आकाशवाणी केंद्राचे समोर हॉटेल गौरव लॉज येथे छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी तेथील मुंबई,सूरत येथील 4 मुलींची सूटका करुन संशयित अरमान खानला अटक करुन घटना स्थळावरुन तसेच संशयिताच्या ताब्यातू मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. याप्रकरणात अरमान खानच्या अन्य साथिदारांचा ग्रामीण पोलिस शोध घेत होते. अधिक तपास करताना ग्रामीण पोलिसांनी गुरुवार 22 मे रोजी यश कांबळे आणि शुभम खडपे या दोघांना अटक केली.