जमीनमालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे नगरपरिषदेचे पोलिसांना पत्र
रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील वरचा फगरवठार येथे अनधिकृतपणे वृक्षतोड आणि उत्खनन केल्यामुळे रस्त्यालगतची कॉंक्रीट संरक्षण भिंत आणि रस्ता ढासळून सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी नगरपरिषदेने कठोर भूमिका घेत संबंधित जमीनमालक आणि उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मौजे झाडगाव म्युनिसिपल हद्दीतील स.नं. ३७६/अ/३/४/२ येथील जमीनमालक जितेंद्र अनंत शेट्ये यांच्या जागेत शुभम सुहास कांबळे यांनी १९ जून २०२६ रोजी धोकादायक झाडे तोडण्यासाठी नगरपरिषदेकडे परवानगी मागितली होती (सि.स.न. २८१०, २८११ व २८१२). मात्र, रत्नागिरी नगरपरिषदेमार्फत या वृक्षतोडीस कोणतीही अधिकृत परवानगी देण्यात आलेली नव्हती. नगरपरिषदेची मंजुरी नसतानाही शुभम कांबळे यांनी या ठिकाणी बेकायदेशीरपणे वृक्षतोड आणि उत्खनन केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.
स्थानिक नागरिकांनी या भागातील रहदारीस अडथळा निर्माण झाल्याची तक्रार केल्यानंतर, २ सप्टेंबर २०२६ रोजी नगरपरिषदेच्या पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या पाहणीदरम्यान रस्त्याच्या बाजूस असणारी सुमारे २.५ फूट रुंदीची कॉंक्रीट संरक्षण भिंत आणि रस्ता ढासळल्याचे दिसून आले. या अनधिकृत कृत्यामुळे नगरपरिषदेच्या म्हणजेच सार्वजनिक मालमत्तेचे गंभीर नुकसान झाले असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी रत्नागिरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम २९६ अन्वये जमीनमालक श्री. जितेंद्र अनंत शेत्ये व श्री. शुभम सुहास कांबळे यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी अधिकृत विनंती रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांकडे पत्राद्वारे केली आहे. सदर पत्राच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि तहसीलदार यांनाही माहिती व पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.









