दापोली:- तालुक्यातील जाळगाव सुतारवाडी येथील एका ८१ वर्षीय वृद्धाचा अंगणात तोल जाऊन पडल्याने मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. मुंबईतील नायर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. १ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता मुंबई येथील नायर रुग्णालयात ही घटना घडली, तर ५ सप्टेंबर रोजी दुपारी १:३७ वाजता या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे.
मयत भागोजी गणू ठोंबरे (वय ८१, रा. जाळगाव सुतारवाडी, ता. दापोली) हे ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मूळ गावाकडील घराच्या अंगणातील कटड्यावर बसले होते. दरम्यान, बसल्या जागी झोपेची डुलकी आल्यामुळे त्यांचा अचानक मागे तोल गेला आणि ते खाली पडले. या अपघातात त्यांच्या मानेला मुक्कामार लागला.
कुटुंबीयांनी त्यांना ९ ऑगस्ट रोजी उपचारासाठी दापोली येथील सरगुरा हॉस्पिटलमध्ये नेले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्या मानेचे हाड फॅक्चर झाले असून ऑपरेशन करावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना २१ ऑगस्ट रोजी पहाटे ५:३८ वाजता मुंबईच्या नायर रुग्णालयात आणण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना वॉर्ड क्रमांक २८ मध्ये दाखल करून उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यान १ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता कर्तव्यावरील डॉक्टरांनी भागोजी ठोंबरे यांना मृत घोषित केले.
घटनेची नोंद प्रथम मुंबईच्या आग्रीपाडा पोलीस ठाण्यात (अ.मृ. अंतर्गत बी.एन.एस.एस. कलम १९४ नुसार) करण्यात आली होती. तिथून कागदपत्रे उशिरा प्राप्त झाल्यामुळे ५ सप्टेंबर रोजी या प्रकरणाची कागदोपत्री नोंद पूर्ण झाली.









