‘अँटी कॉईन’चे आमिष दाखवून गंडा घालणारी टोळी जेरबंद

चिपळूण:- चमत्कारिक अँटी आयर्न कॉईन किंवा राईस पुलर कॉईन बनवून त्याची विक्री करून चांगला फायदा मिळवून देतो, सांगत चिपळूणमधील एकाची चार लाखांची फसवणूक करणाऱ्या चारजणांच्या टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली. अशी माहिती या गुन्ह्याचा तपास करणारे पराग भाट यांनी ‘सकाळ’ला दिली. संशयितांना ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. टोळीने राज्यातील अनेक भागातील लोकांची फसवणूक केल्याचे तपासादरम्यान समोर आल्याचे भाट यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘मीरारोडच्या नया नगर भागातील मरियम इमारतीत राहणारे एजाज करिमुद्दीन सय्यद यांना कपिल (रा. बोरिवली) याने अँटी आयर्न कॉईन बनवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे केमिकल आणून तो कॉईन बनवल्यानंतर बाजारात त्याच्या विक्रीतून चांगला फायदा मिळतो, असे सांगितले. त्यानुसार सय्यद यांनी ५० हजार रुपये कपिलला दिले होते; परंतु कपिलने कॉईन बनवून फायदा तर दूर; पण मुद्दलसुद्धा न दिल्याने सय्यद यांनी नया नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी २२ सप्टेंबरला गुन्हा दाखल केला.

पोलिसांना कपिल याचे छायाचित्र व फूटेज मिळून तपास करत कपिल हरिश्चंद सिकोरिया (वय ३७, रा. मारू निवास, कार्टर रोड क्र. ७, बोरिवली) या शिंपीकाम करणाऱ्यास अटक केली. त्याच्या चौकशीनंतर ट्रॅव्हलचा व्यवसाय करणारा सुरज नामदेव मोरे (वय ४१) व सनी सुहास दत्ता (वय २४, दोघे रा. एसपेरेन्स बिल्डिंग, क्रॉस गार्डन, भाईंदर) व दलाली करणारा किरण कालुभाई परमार (वय ३३, रा. न्यु सनराईज बिल्डिंग, आरएनपी पार्क, भाईंदर पूर्व) अन्य तीन जणांना अटक करण्यात आली. संसद आरोपींनी आतापर्यंत ३० जणांची सुमारे १४ लाख ५० हजाराची फसवणूक केली आहे. त्यात चिपळूणमधील एक व्यक्ती आहे.