Saturday, August 22, 2026
spot_img
Home संगमेश्वर ॲट्रोसिटी प्रकरणातील ३५ संशयितांची निर्दोष मुक्तता

ॲट्रोसिटी प्रकरणातील ३५ संशयितांची निर्दोष मुक्तता

मार्गताम्हाने येथील घटना

संगमेश्वर:- तालुक्यातील मार्गताम्हाने येथे २०१३ साली पद्मावती देवीच्या पालखीवरून निर्माण झालेल्या वादानंतर दाखल करण्यात आलेल्या ॲट्रोसिटी प्रकरणात चिपळूण जिल्हा व सत्र न्यायालय यांनी महत्त्वपूर्ण निकाल देत ३५ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी हा निकाल सुनावला.

दि. २३ मार्च २०१३ रोजी मार्गताम्हाने ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पद्मावती देवीच्या पालखीवरून मराठा समाज आणि चर्मकार समाज यांच्यात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर दोन्ही समाजातील वाद मिटवण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला डीवायएसपी, चिपळूण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी, तहसीलदार तसेच प्रांत अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर वाद मिटल्याचे सांगण्यात आले होते तसेच गावात पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

या प्रकरणात सरकारी पक्षाकडून न्यायालयात एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. मात्र साक्षीदारांच्या जबाबांमधील विसंगती, उलटतपासणीदरम्यान समोर आलेल्या बाबी आणि उपलब्ध पुराव्यांचा विचार करता आरोपींविरोधातील आरोप सिद्ध होत नसल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. त्यामुळे सर्व ३५ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपींच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. नितीन केळकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना ॲड. सोहम भोजने आणि ॲड. अनिश केळकर यांनी सहकार्य केले.