रत्नागिरी:- गतवर्षी जिल्ह्यातुन जाणा-या मुंबई – गोवा व मि-या – नागपूर या दोन राष्ट्रीय महामार्गांवरून जाणा-या वाहनांना शिस्त लावण्यासाठी महामार्ग वाहतुक पोलीस मदत केंद्र हातखंबा पोलिसांकडून मदतकेंद्र येथे व इंटरसेप्टर वाहनाद्वारे विशेष मोहिम राबविण्यात आली होती. त्यामध्ये एकूण १ जानेवारी ते ३१ जुलै २०२१ मध्ये ८९४५ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये २५ लाख बावन्न हजार पाचशे रुपयांचा दंड करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती देताना महामार्ग वाहतुक पोलिस हातखंबा शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमर पाटील यांनी सांगितले की, चालूवर्षी १ जानेवारी २०२१ ते ३१ जुलै २०२१ या दरम्यान महामार्ग पोलिस महासंचालक ठाणे यांच्या आदेशानुसार महामार्गावरील नियम तोडणा-या बेशिस्त वाहनचालकांवर व अवजड व अतिरिक्त भार वाहुन नेणा-या वाहनांवर दंडात्मक कारवाईची विशेष मोहिम राबविण्यात आली.
गतवर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे दोन्ही राष्ट्रीय महामार्गांवर वाहतुकीमध्ये घट झालेली होती. काही वाहनचालक नियमांचे उल्लंघन करतात त्याचा फटका इतर वाहनांना बसुन अपघात होतात त्यासाठी शिस्त लागण्यासाठी कारवाई केली जाते. चालूवर्षी इंटरसेप्टरद्वारे अति वेगाने जाणार्या ४७५ वाहनांवर कारवाई केली, वाहन चालविताना मोबाईल वर चालकाने संभाषण करणे ७, वाहन चालविताना सीटबेल्ट न लावणे ९६०, अवजड वाहनांना पुढे व मागे रिफलेक्टर न लावणे, अवजड ट्रेलर व ट्रक यांसारख्या वाहनांतून फाळका न लावता उघडपणे मोठे पाईप व लोखंडी सळई सारखे साहित्य वाहतूक करणे व दुचाकीवर हेल्मेट न घालणे ११२२ तसेच विना विमा वाहन चालवले ५७, माल गाडीतून प्रवाशी वाहतूक करणे ३२ तसेच दारू पिऊन वाहन चालवणे १० चालकांवर कारवाई व इतर प्रकारच्या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एकूण ८९४५ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
चालू वर्षी या महामार्गावर प्राणांकित ३८ अपघातांमध्ये १३ मयत झाले होते तर गंभीर जखमी ०५ अपघातांपैकी ०५ गंभीर जखमी झाले होते. तर किरकोळ २० अपघातांमध्ये १७ किरकोळ जखमी झाले होते. तर विनादुखापतीचे अपघात झाले असे एकूण ४३ अपघात झाले आहेत. या अपघात ग्रस्तांना महामार्ग मृत्युजय दूत पथकातील सदस्यानी तात्काळ अपघातग्रस्तांना मदत केल्याने जखमींचे प्राण वाचण्यास मदत झाली तसेच अपघात प्रवण ठिकाणी उपाययोजना केल्याने अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे.