शासनाच्या मंजुरीनंतर अंतिम यादी होणार जाहीर
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांच्या मुलाखतीची प्रक्रिया नुकतीच पार पडली. यात २६ प्राथमिक शिक्षकांनी आपल्या शैक्षणिक व नावीन्यपूर्ण कार्याचा लेखाजोखा निवड समितीसमोर मांडला. शासनाकडून मंजुरी मिळताच पुरस्कारप्राप्त ९ आदर्श शिक्षकांची नावे अधिकृतपणे जाहीर केली जाणार आहेत.
या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून ३ याप्रमाणे एकूण २७ प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी २६ शिक्षक मुलाखतीसाठी उपस्थित राहिले. मुलाखतीदरम्यान शिक्षकांनी वर्गात राबवलेले नावीन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेले विशेष प्रयत्न, तंत्रज्ञानाचा वापर आणि शाळा-समाजाच्या विकासातील योगदान याबाबत माहिती दिली. निवड समितीने प्रत्येक शिक्षकाच्या कामाची कसून पाहणी व सखोल मूल्यांकन केले.
या मूल्यांकन प्रक्रियेवेळी जि.प. अध्यक्षा अस्मिता केंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपाध्यक्ष विलास चाळके, शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, सुयोग कांबळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीषा कदम, माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुलाखतींच्या मूल्यांकनानंतर प्राप्त गुणांच्या आधारे जिल्ह्यातील गुणवंत ९ शिक्षकांची अंतिम यादी तयार केली जाणार आहे. शासनाकडून मंजुरी मिळताच पुरस्कारप्राप्त ९ आदर्श शिक्षकांची नावे अधिकृतपणे जाहीर केली जातील, असे सांगण्यात येत आहे.









