रत्नागिरी:- केंद्राच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा विनियोग करून ग्रामीण भागाचा कायापालट करण्यात रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी बाजी मारली आहे. सन २०२०-२१ ते २०२५-२६ या पाच वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी त्यांना प्राप्त झालेल्या निधीपैकी तब्बल ६८.६२ टक्के निधी थेट विकासकामांवर खर्च करत उत्तम कामगिरीची नोंद केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तुलनेत ग्रामपंचायतींनी निधी खर्चात मारलेली ही मुसंडी कौतुकास्पद ठरत आहे.
अहवालानुसार, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना एकूण ५०४ कोटी ५० लाख ९२ हजार १९१ रुपयांचा विक्रमी निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी ३४६ कोटी १७ लाख ४० हजार ४०४ रुपये इतका प्रचंड निधी प्रत्यक्ष विकासकामांवर खर्च झाला आहे. या तुलनेत जिल्हा परिषद स्तरावर प्राप्त ६५ कोटी ११ लाख ५४ हजार २२९ रुपयांपैकी २० कोटी ३७ लाख ४७ हजार ८४९ रुपये (३२.२९ टक्के) खर्च झाले आहेत, तर पंचायत समिती स्तरावर प्राप्त ६५ कोटी ११ लाख ५४ हजार २२९ रुपयांपैकी २६ कोटी ४७ लाख ३७ हजार १०२ रुपये (३२.९८ टक्के) निधी खर्च झाला आहे.
ग्रामपंचायतींना मिळालेल्या या निधीतून गावागावांतील मूलभूत सुविधांच्या विकासाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने रस्ते मजबुतीकरण, पाणीपुरवठा योजना, स्वच्छता अभियान, सांडपाण्यासाठी गटारे बांधणे आणि सार्वजनिक दिवाबत्ती व्यवस्था सुधारणे अशा कामांचा समावेश आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या या निधीमुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचे जाळे बळकट झाले असून रत्नागिरीतील ग्रामपंचायती प्रशासकीय आणि विकासकामांच्या दृष्टीने अधिक सक्षम झाल्याचे दिसून येत आहे.









