रत्नागिरी:- शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालयाने नमूद केलेल्या प्रवेशसंख्येबाबत शिक्षण क्षेत्रातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे १५ प्रवेशांची अट प्राथमिक शिक्षण संचालनालयाने रद्द केली आहे.
प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी या संदर्भातील निर्देश परिपत्रकाद्वारे दिले आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीची आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आरटीईच्या प्रवेशांबाबत मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यात प्रवेशांसाठी ३० सप्टेंबर ही अंतिम मुदत असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तसेच आरटीई प्रवेश क्षमता ही ३०-३० च्या दोन तुकड्या धरून त्याचे २५ टक्के म्हणजे जास्तीत जास्त १५ राहील असे नमूद केले होते. मात्र आरटीईची प्रवेशसंख्या कमी हो असल्याची टीका शिक्षण क्षेत्रातील संघटनांकडून करण्यात येऊ लागली. परिणामी टेमकर यांनी ही अट रद्द केल्याचे स्पष्ट केले आहे.









